भाजपचे मंत्री म्हणतात ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’

टीम महाराष्ट्र देशा : ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’ असं वक्तव्य भाजपच्या मंत्र्यानं केलं आहे. गुजरातमधील भाजपचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी हे वक्तव्य केलं असून गुजरातमधील मतदारांनी भाजपाला सत्तेत आणले असून ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘इच व्होट फॉर मोदी’ असंच येथील मतदारांना वाटत असल्याचं ते म्हणाले आहेत. गुजरातमधील मतदारांसाठी राबवलेल्या जनजागृती मोहीमेसाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि माहिती व प्रसारण विभागाचे कौतुक केलं असून गुजरात विधानसभेत माहिती व प्रसारण विभागाच्या १२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीवर ते बोलत होते.

निकालानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. परंतु त्यांना आता चपराक बसली असून ईव्हीएम म्हणजे इच व्होट फॉर मोदी असं मतदारांना वाटल्यामुळेच त्यांनी भाजपला भरभरुन मतदान केलं असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच त्यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली असून निवडणुकीच्या कालावधीतच काँग्रेसला मंदिराची आठवण आली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. ज्यावेळी देशात गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता, त्यावेळी माहिती व प्रसारण विभागाने सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आहे. जर देशात गुजरात अव्वल स्थानी असेल तर यात माहिती व प्रसारण विभागाचे योगदान मोलाचे असणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यात जनसंपर्क विभागाला यश आले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि याचे परिणाम निकालातही दिसून आले असल्याचं ते म्हणाले आहेत.