fbpx

चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. देशमुख राजेवाडी येथील एका कार्यक्रमावरून परतत असताना “चार वर्षात विकास कामे का केली नाहीत” असा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. या वेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण करून त्याचा मोबाईल देखील हल्लेखोरांनी फोडला. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अखेर पोलिसांच्या गाडीतून त्यांना पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले.

राजेवाडी येथे आज अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रमात आमदार देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ते परत निघाले असता येथील जिल्हापरिषद शाळेजवळ गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद, भाऊसाहेब पवार, माऊली महागोविंद, ईश्वर थेटे, सुखदेव कुरे यांच्यासह 25 ते 30 जणांनी गाडी अडवली. आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही तसेच बंधाऱ्याचे काम का केले नाही, असे म्हणत आमदारांना घेराव घालत गाडीतून खाली खेचून त्यांच्यावर हल्ला केला.

तसेच त्यांच्या पीएचा मोबाईल खेचून घेऊन फोडला व गाडी चालकाला देखील मारहाण केली. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक तात्काळ धावून आले व त्यांना आमदारांच्या भोवती कडे करून तेथून बाजूला आणले. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व आपल्या गाडीतच आमदार देशमुख यांना पोलीस बंदोबस्तात रवाना केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

आमदारकीसाठी काहीही…माढ्याचे संजय शिंदे होणार ‘करमाळा’कर