भाजप आ.जगजितसिंह पाटील व सेना आ.तानाजी सावंत या ‘हाडवैर’ असणाऱ्या दोन नेत्यांची पुण्यात ‘ग्रेटभेट’

टीम महाराष्ट्र देशा:भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे जिल्ह्यातील ‘राजकीय हाडवैर’ सर्वांनाच परिचित होते. परंतु जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीच्या नाट्यमय घडामोडीनंतर या दोन्ही नेत्यामधील ‘राजकीय कटुता’ संपुष्टात आली असून सध्या दोन्ही नेत्यात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ अशी ‘मनोमिलणीय’ परिस्थिती निर्माण झाली आहे. ही मैत्री आणखीन घट्ट करण्याच्या उद्देशाने या दोन नेत्यांनी पुण्यात एका ‘खास ठिकाणी’ एकमेकांची भेट घेतली आहे. दोघांत बऱ्याच विषयावर चर्चा व खलबते झाल्याचे समजते. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूकीच्या नाट्यमय घडामोडीनंतर या ‘दोन मातब्बर’ नेत्यामधील ही पहिलीच भेट असल्याने ती महत्वपूर्ण मानली जात आहे.

आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपकडून तर आ.तानाजी सावंत यांनी सेनेकडून विधानसभा निवडणुक लढवली. या दोन मातब्बर नेत्यांच्या ताकदीवर जिल्ह्यातील चारही जागा कधी नव्हे ते महायुतीच्या निवडून आल्या. राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्याने या दोन्ही नेत्यांचा राज्य मंत्रीमंडळात समावेश होईल व जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाचे अनेक प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागतील अशी सर्वांना खात्री होती. पण झाले उलटेच! महायुती तुटल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये तरी आ.सावंत यांची मंत्री म्हणून वर्णी लागेल व जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल असे वाटत होते पण येथेही माशी शिंकली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही नेत्यांच्या कुरघोडी पद्धतीच्या राजकारणामुळे आ.सावंत यांची मंत्रिपदाची संधी हुकली.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सत्ता सध्या आ.पाटील व आ.सावंत गटाकडे आहे. दोघांतील ‘राजकीय गट्टी’ सध्या चांगलीच जमली आहे. भविष्यात जिल्हा सहकारी बँकेसह अनेक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहे. त्याअनुषंगाने ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या दोन सक्षम नेत्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्याच्या ‘भुवया’ मात्र उंचावल्या आहेत.