fbpx

भाजप नेत्यांना भूक सहन होईना; उपोषणकर्त्या आमदारांनी मारला वेफर्सवर ताव

bjp-leaders-do-not-suffer-hunger

पुणे : दोन दिवसांपूर्वीच सरकार विरोधात काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले होते. मात्र उपोषणा आधी छोले भटूरेवर ताव मारणाऱ्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे काँग्रेसचे उपोषण म्हणजे केवळ मगरीचे अश्रू असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली होती. आता सत्ताधारी भाजपकडून आज देशभरात संसदेतील गोंधळी विरोधकांच्या निषेधार्थ उपोषण केले जात आहे. मात्र या उपोषणाचा पुरता फज्जा उडताना दिसत असून भूक सहन न झालेले भाजप आमदार वेफर्सवर ताव मारतानाच व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असणाऱ्या फुटपाथवर मोठ्या उत्साहात भाजप नेते उपोषणाला बसले, यामध्ये खासदार अनिल शिरोळे, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे आमदार , महापालिका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुरुवातीला काही काळ आमदार भीमराव तापकीर, आमदार बाळा भेगडे हेही उपोषणाला बसले.

दरम्यान, जिल्हा खरीप हंगामाची विभागीय बैठक आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यासाठी आमदार भेगडे आणि तापकीर यांनी हजेरी लावली. बैठक सुरू असताना दरवेळीप्रमाणे पुढे आलेले सँडविच, मिठाई आणि वेफर्सवर दोन्ही आमदारांनी ताव मारला. दरम्यान हाच व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या उपोषणाचा देखील काँग्रेसप्रमाणे फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे.

उपोषणकर्ता भाजप आमदारांनी मारला वेफर्सवर ताव