भाजप नेता म्हणतो आता भारतात ‘रामराज्य’ येईल…

pm modi

पुणे : ‘प्रभू श्रीरामाचे राज्य लोकाभिमुख होते. त्यांचाच आदर्श ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक लोकाभिमुख योजना भारतीय जनतेसाठी राबवत आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिरांचे भूमिपूजन करून नरेंद्र मोदी यांनी देशात ‘रामराज्य’ येईल, असा विश्वास दिला आहे. अनेक वर्षांचे मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार झाल्यानंतर आता लोकाभिमुख योजनांमुळे ‘रामराज्य’ साकार होईल,’ असे प्रतिपादन नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे राजेश पांडे यांनी केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दीपक नागपुरे व प्रभाग क्रमांक ३४ च्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभागातील ७५० नागरिकांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ‘आयुषमान भारत’चे कार्ड वाटण्यात येणार आहे. त्यामुळे पाच लाखांपर्यत मोफत उपचार होणे शक्य होईल. यावेळी पांडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २०-२५ नागरिकांना हे कार्ड प्रदान करण्यात आले. प्रभू रामाच्या प्रतिमेचे पूजन करून मिठाई वाटण्यात आली. परिसरात दिव्यांची आरास, विद्युत रोषणाई, रांगोळी करण्यात आली होती. यावेळी दीपक कवाने, दीपक महाडिक, सचिन गोसावी, मंगेश बुजवे, प्रणव कुकडे, सौरभ मंडावले, संदीप कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

खरा योद्धा : आईच्या निधनानंतर राजेश टोपे केवळ तीनच दिवसांत उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत !

राजेश पांडे म्हणाले, ‘पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून पाच लाखांचा आरोग्यविमा दिला जात आहे. उज्ज्वला योजनेत गृहिणीना मोफत गॅस दिला जात आहे. अंत्योदय योजनेतून सामान्यांना धान्य दिले जात आहे. अशा कितीतरी योजना सामान्य जनतेसाठी नरेंद्र मोदी प्रभावीपणे राबवत आहेत.’ दीपक नागपुरे म्हणाले, ‘श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाल्याने आनंदाने मन भरून आले आहे. अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. देशाला एक नवी दिशा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.’

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण