सोपलांच्या बोलणे आणि कृतीमध्ये फरक, निवडणूक आल्यावरचं कारखान्याची आठवण कशी ? – राऊत

टीम महाराष्ट्र देशा: दिलीप सोपल यांच्या बोलणे आणि कृतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पद मिळाल्यानंतर पाऊणे पाच वर्षे कुंभकर्णाप्रमाणे झोपणारे निवडणूक आल्यावर जागे झाले आहेत. विधानसभेच्या मतदानाला वीस – पंचवीस दिवस शिल्लक असताना कारखान्याची आठवण कशी झाली. आर्यन कारखान्याकडे जवळपास ३०० कोटी रुपयांची देणी आहेत. तर नवीन कारखाना उभारण्यास १०० कोटी लागतात. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांना खोटी माहिती देऊन, निवडणुकीपुरती घोषणा करायला सांगितली असावी, अशी टीका भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केली आहे.

सोलापूर जिल्ह्य बँकेच्या ताब्यात असणारा बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सावंत यांच्याकडून ‘आर्यन’ला पुनरुज्जीवन मिळणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हा कारखाना विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी सुरु केला होता, मात्र पुढे तो भोसले – नलावडे यांच्या कुमुद शुगरकडे हस्तांतरित करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद आहे.

विधानसभेच्या तोंडावर सावंत यांच्याकडून कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सोपल गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर राजेंद्र राऊत यांनी सोपलांवर टीका केली आहे. आर्यन साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे २५० कोटी, शेतकऱ्यांची थकीत देणी ३२ कोटी, शेअर्स धारकांचे १८ कोटी, नॅशनल बँकेचं २० कोटींच्या आसपास कर्ज आहे. नवीन कारखाना चालू करण्यास १०० कोटी रुपये लागत असताना ३०० कोटींचे देणे असणारा बंद पडलेला कारखाना तानाजी सावंत कसा घेतील, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, साखर उद्योगातील अडचणीमुळे कारखाना बंद आहे. हजारो शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आर्यन कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं तानाजी सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सागितले आहे. भैरवनाथ शुगरकडून जिल्हा बँकेशी सकारात्मक चर्चा सुरु असून लवकरच हस्तांतरन होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.