मुंबईत दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी; पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपाकडून सभा तहकुबीचा प्रस्ताव

bmc

मुंबई – मुंबईत रविवारी १८ जुलै पहाटे झालेल्या मुसळधार पावसात चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ निरपराध नागरिकांचा बळी गेला. शहरात अश्या घटना वारंवार घडत असून महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे ही बाब अत्यंत दुख:द, वेदनादायी व क्लेशकारक असून मुंबई महानगरपालिका प्रशासनाला भूषणावह नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत कोणतेही कामकाज न करता सभा तहकुब करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. परंतु शिवसेनेने सदर सभा तहकुबी विचारात न घेता या विषयावर कोणतीही चर्चा न करता सभागृहाच्या कामकाजाच्या प्रथा परंपरेचे उल्लंघन करून श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभागृह नेत्यानी मांडण्याची परंपरा धुडकावून स्वतः थेट अध्यक्षांनी फक्त श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरही कोणतीही चर्चा न करता श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली.

खरे पाहता दरड कोसळीचे प्रकार वारंवार घडून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगरसेवकांचे मत, विचार व सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. पण मुर्दाड प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला असा आरोप भाजपने केला आहे. यापूर्वी मालाड येथे महापालिकेच्या जलाशयाची भिंत कोसळून पाच निरपराध मुंबईकरांचा नाहक बळी गेला होता. सातत्याने अशा अपघातांमध्ये वाढ होत असताना निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुर्दाड प्रशासनाला याबाबत कुठलेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. परंतु सत्ताधारी चर्चेलासुद्धा तयार नाहीत हे मुंबईकरांचे दुर्दैव आहे असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले.

मुंबईत रविवारी १८ जुलै पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे मोठी जीवित हानी झाली. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता महापालिका प्रशासन ज्याप्रमाणे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करते त्याच धर्तीवर दाट लोकवस्ती असलेल्या डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींचे महापालिकेमार्फत तातडीने सर्वेक्षण करुन तेथील असुरक्षित व धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन जीवित तसेच वित्त हानी टाळता येईल. तसेच या सर्व ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून तातडीने आवश्यक निधीची उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे मत गटनेते  शिंदे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP