‘मावळ’ला हरला असला तरी खरा ‘मावळा’ शोभतो…

parth pawar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या केसची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली.

मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही ते अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवारांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले. त्याचबरोबर सीबीआय चौकशीवरुन शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यानंतर भाजपचे नेत्यांनी पार्थ पवारांच्या बाजूने बोलायला सुरवात केली आहे. आधी आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार लंबी रेस का घोडा आहे म्हणत पार्थ यांना समर्थन दिले होते. तर, आता भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी पार्थ पवार मावळे शोभत असल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मावळ’ ला हरला असला तरी खरा ‘मावळा’ शोभतो… या आशयाचे ट्विट अवधूत वाघ यांनी केले आहे.

तर दुसरीकडे दिवसभराच्या चर्चेनंतर पार्थ पवार यांनी रात्री शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही भेट झाली. मंगळवारी पवारांनी अतिशय कडक भाषेत समज दिल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ हे शरद पवारांची भेट घेत आहेत. पार्थ हे नाराज असल्याच्या बातम्याही दिवसभर येत होत्या त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही भेट म्हणजे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातं आहे.