‘..तेव्हापासून बाई मोदी द्वेषाने पछाडलेल्या’, भाजप नेते भातखळकरांचा मेधा पाटकरांना टोला

मुंबई : काही दिवसांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कोरोना स्थितीवर भाष्य केले. ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर उपाययोजना, ऑक्सिजनची व्यवस्था करणे गरजेचे होते. पण याकडे शासनाने डोळेझाक केली. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर झाली आहे. यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे’, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला.

‘केंद्राच्या तुलनेत महाराष्ट्र सरकावर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने स्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्थिती अतिशय गंभीर आहे’ असे पाटकर त्यावेळी म्हणाल्या. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र देशा’ने प्रकाशित केले होते. दरम्यान, भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ची ही बातमी ट्विटरवर शेअर करत मेधा पाटकर यांच्यावर टीका केली आहे.

‘मेधा पाटकर यांच्या आंदोलनाचे जेव्हापासून मोदींनी नर्मदेत विसर्जन केलंय, तेव्हापासून बाई मोदी द्वेषाने इतक्या पछाडलेल्या असतात की त्यांना महाराष्ट्रात आलबेल आणि दिल्लीही कोरोनामुक्त वाटू शकेल’ असा टोला आमदार भातखळकर यांनी मेधा पाटकरांना लगावला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल निकालानंतर अमित शाह आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. यावर आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?’ असे ट्वीट करून त्यांनी मलिकांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या