चांगल्या नेत्याची राजकीय कारकिर्द कशी संपवावी, हे भाजपला चांगलेच ठाऊक

हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून, चोपडा येथे तेराव्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या.

चोपडा: भाजप नेहमीच चांगल्या नेत्यांचा कार्यक्रम करते. सर्वात आधी त्यांनी जळगावमधील स्वतःच्या पक्षातील नेत्याचाही कार्यक्रम केला होता. खरंतर तो जळगावचाच अपमान होता. असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केले. हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून, आज चोपडा येथे तेराव्या सभेत त्या बोलत होत्या.

एकनाथ खडसे यांना जमीनवाद प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपनेही खडसेंवर दुर्लक्ष केले. एकनाथ खडसे यांनी सुद्धा भाजप प्रती जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, एखादा चांगला नेता असेल तर त्याची राजकारणातील कारकिर्द कशी संपवावी, हे भाजपला चांगले माहित आहे.

सध्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपने आपल्यात घेतले आणि आता झुलवत ठेवले आहे. याआधी भाजपने जळगावमधील स्वतःच्या नेत्याचाही असाच कार्यक्रम केला होता, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आता फक्त प्रामाणिक लोकांना स्थान देऊन संधी साधूंना आता दूर करण्यात येईल. राष्ट्रवादीत आयाराम – गयारामांना आता स्थान दिले जाणार नाही.
असेही त्या म्हणाल्या.