प.बंगालमधील हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी भाजपने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले

नवी दिल्ली : दि. २ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. तृणमूलच्या दंगेखोरांनी भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे या हिंसाचारप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. भाजप प्रवक्ते आणि वरिष्ठ वकील गौरव भाटिया यांनी एक याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर होत असलेला हिंसाचार, हत्या आणि अत्याचांराच्या घटनांची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

भाटिया यांनी याचिकेत आरोप केला की, तृणमूल काँग्रेसचे सदस्य अशा लोकांना निशाणा बनवत आहेत ज्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मत दिले होते. दरम्यान, कोलकात्यात अभिजीत सरकार यांच्या झालेल्या हत्येचा उल्लेख करत भाटिया म्हणाले, ‘ही घटना याचं प्रतिक आहे की, टीएमसीच्या छत्रछायेखाली पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा नंगानाच सुरू आहे’

सीबीआय चौकशीशिवाय पश्चिम बंगाल सरकारला या घटनांबाबत दाखल एफआयआर आणि या घटनांमध्ये सामिल लोकांच्या अटकेसंबंधी स्टेट्स रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. तृणमूलचा पोलीस आणि इतर संस्थावर दबाव असल्याने आतापर्यंत याप्रकरणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हाही दाखल झालेला नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या