भाजप देश तोडण्याचे काम करत आहेः मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसने लोकशाही व धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करून या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष जातीयवादाचे व धार्मिक द्वेषाचे विष पसरवून राजकीय फायद्यासाठी देश तोडण्याचे काम करत आहेत, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेनेच्या नाकर्त्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशाल जनसभेला मार्गदर्शन करताना खर्गे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, फैजपूरच्या पावन भूमित १९३६ साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकशाही आणि संविधानाबाबत महत्त्वाची चर्चा झाली व त्यामुळेच पुढे आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान मिळाले. पण भाजपचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. नरेंद्र मोदींनी देशाच्या सामाजिक एकतेचे आणि अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे.

देशातील कायदा सुव्यवस्थेची दयनीय स्थिती, इंधन दरवाढ, घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणे, दलित, महिला, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार, शेतक-यांच्या आत्महत्या याबाबत पंतप्रधान काही बोलत नाहीत. पण राजकीय फायद्यासाठी वारंवार खोटे बोलून देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्यांचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? शेतीमालाला दीडपट हमीावाचे काय झाले? साठ वर्षात काय झाले? हे विचारणा-या मोदींनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकालात काय केले? ते सांगावे. इंधनावरील कर वाढवून सरकारने सर्वसामान्यांच्या खिशातले १२ लाख कोटी रूपये काढून घेतले.

या पैशातून शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य आहे पण मोदी शेतक-यांना लाठ्या काठ्याने झोडपत आहेत व आपल्या उद्योगपती मित्रांची हजारो कोटींची कर्ज माफ करत आहेत. मोदींना सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजपला पराभूत करून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा असे आवाहन खर्गे यांनी उपस्थितांना केले