युतीसाठी भाजपकडून हिरवा कंदील; आता प्रतीक्षा शिवसेनेच्या निर्णयाची

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधीच आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होऊन याचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार असल्याने भाजपकडून सातत्याने युतीसाठी शिवसेनेची मनधरणी केली जातीये. ”युतीसाठी आम्ही तयार आहोत आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पालघरच्या विजयानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

त्यांनी यावेळी भाजपला कौल दिल्याबद्दल पालघरच्या जनतेचे आभार देखील मानले. ही निवडणूक क्लेषदायक होती. मित्रांमध्येच कटुता निर्माण झाली. शिवसेनेनं ठरवलं असतं तर ही कटुता टाळत आली असती. आता निवडणूक संपली आहे त्यामुळं कटुताही विसरली जावी. असं फडणवीसांनि म्हंटले आहे.

ज्या पक्षांविरूद्ध आयुष्यभर लढलो त्या पक्षांसोबत शिवसेना जाणार नाही असं वाटते. युतीसाठी भाजपने सदैवच पुढाकार घेतला आहे. मात्र युती किंवा चर्चा ही एकतर्फी होत नसते. चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. असं म्हणत त्यांनी शिवसेनेला युतीसाठी पुन्हा एकदा गोंजारण्याचा प्रयत्न केला. मात्र आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.