संगमनेर – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकऱ्यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार भूपेश बघेल यांनी काढले.
मालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख , बाजीराव पा.खेमनर, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, राजेश मालपाणी, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, विजय अण्णा बोराडे , उत्कर्षाताई रूपवते , प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, इंद्रजितभाऊ थोरात, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याप्रसंगी बोलताना बघेल म्हणाले की, महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकाराचे मॉडेल सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर व परिसरासाला वैभवाचे दिवस आल्याचे बघेल म्हणाले.
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा समृद्ध वारसा नामदार बाळासाहेब थोरात हे सांभाळत आहेत. मला कधीही बाळासाहेब थोरात यांचा फोन आला की पहिले निळवंडेचे काम आहे असेच वाटते. भाऊसाहेब थोरात , थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2023 – 24 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे हाच महाविकास आघाडी सरकारचा मुख्य उद्देश असून यासाठी वळण बंधाऱ्यांना ही स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या कामांना गती दिली आहे. बाळासाहेब थोरात सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला असून सहकार बरोबर शैक्षणिक व प्रगतीमध्ये हा संगमनेर तालुका अग्रेसर ठरला आहे. राज्यातही बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या सहकार्यामुळेच महाविकास आघाडी सरकार आले आहे. शेततळ्यातून झालेली जलक्रांती किंवा कोणत्याही योजना कशा प्रभावीपणे राबवावी हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिकावे असेही ते म्हणाले.
महसूल थोरात म्हणाले की, भूपेश बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदिप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे ,तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घातलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. अडचणीच्या काळातही संजय आवटे यांनी पुरोगामी विचार जोपासला असून रणजितसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला आहे. तर माधवराव कानवडे सहकारातील महत्त्वाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नवा कारखाना निर्मितीचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप हे शेतकऱ्यांना वेठीस धरून भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे. याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
- हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे