आश्वासने दयायची आणि निवडणूकीनंतर विसरायची कशी हे भाजपाने भारतात शिकवले – जयंत पाटील

मुंबई दि.८ ऑगस्ट – लोकांना आश्वासन दयायची आणि निवडणूकीनंतर विसरायची कशी हे भाजपाने भारतात शिकवले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटी पॅकेजचे दिलेले आश्वासन अदयाप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी कल्याण-डोंबिवलीपासून सुरुवात करावी याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयुक्तांना करुन दिली.

निवडणूक न लढविणाऱ्या आणि आश्वासनांची पूर्तता अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. त्यावर मिडियाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागतच केले परंतु त्याची अंमलबजावणी करताना त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापासून करावी याची आठवण करुन दिली.

नगरपालिकेत, महानगरपालिकेत जर पक्षाने कमिटमेंट केलेली असेल आणि ती पूर्ण नाही केली तर त्या पार्टीची परवानगी आणि त्या पार्टीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका सहारियासाहेब घेणार का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

शेवटी संतुलन राखणं सोपं आहे परंतु या महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या निवडणूकांमधील आश्वासने कुठल्या पक्षांनी पूर्ण केली आहेत आणि किती केली आहेत. हे समजून घेण्यासाठी सहारिया यांनी पक्षांनी जाहीर केलेले जाहीरनामे प्रकाशित करण्याअगोदर निवडणूक आयोगानी ते अगोदर मागवून घ्यावेत. ते प्रकारानुसार तपासावेत त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्याप्रमुखांशी चर्चा करावी आणि त्यांची कमिटमेंट घेवून मग ते जाहीरनामे प्रसिध्दीला दयावेत आणि ते प्रसिध्द केल्यानंतर त्या जाहीरनाम्यातील मुद्दे पूर्ण केले नाहीत म्हणजे ७० टक्के मुद्दे पूर्ण केले नाहीत तर त्या पार्टीला किंवा त्या गटाला पुढच्या निवडणूकीमध्ये उभे राहण्यास मज्जाव करावा असा क्रांतिकारक निर्णय सहारियासाहेब घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हापरिषदांमध्ये सर्व पक्ष जेवढं जमेल तेवढंच बोलतील त्यामुळे सहारिया यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी ते ताबडतोबीने शेवटच्यास्तरापर्यंत न्यावे. आम्हा वेगवेगळया पक्षाच्या लोकांना बोलावून घ्यावे आम्ही काही चांगल्या सूचना आणि अंमलबजावणी कशी करायची याची माहिती देवू असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.