‘ती’ ऑडिओ क्लिप बनावट; काँग्रेस आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र बहुमत सिद्ध न करता आल्याने बी. एस. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर दुसरीकडे काँग्रेसने जेडीएसला पाठींबा देऊन, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपला संधी देण्यात आल्याने या विरोधात काँग्रेसने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी आपल्या आमदारांना खरेदी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलता. याचा पुरावा म्हणून त्यांनी काही ऑडिओ क्लिपही सादर केल्या होत्या. मात्र, काँग्रेसचा हा दावा त्यांच्याच एका आमदाराने खोडून काढत भाजपाकडून कुठलीही पैशांची ऑफर मिळाली नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळे काँग्रेसला चांगलाच घरचा आहेर मिळाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार येल्लापूर येथील काँग्रेसचे आमदार शिवराम हेब्बार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून त्यात काँग्रेसने प्रसिद्ध केलली ऑडिओ क्लीप बनावट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ही बनावट क्लीप बनवणाऱ्यांवर टीकाही केली आहे. भाजपाकडून घोडेबाजार होत असल्याचे सांगत अनेक ऑडिओ क्लीप्स काँग्रेसने समोर आणल्या होत्या. तसेच यातील एका क्लीपमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचाही आवाज असल्याचा दावा त्यांनी केला होता.

हेब्बार यांनी कन्नड भाषेत ही फेसबुक पोस्ट लिहीली आहे. त्यांनी यात लिहीले की, मला खूपच उशीरा सुचना मिळाली की, फोनवर माझ्या पत्नीची भाजपाच्या लोकांसोबत चर्चा झाली आहे. मात्र, या क्लीपमध्ये माझ्या पत्नीचा आवाज नाही तसेच तिला भाजपाच्या लोकांकडून कुठलाही फोन आला नव्हता. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप बनावट असून त्याची मी निंदा करतो. दरम्यान, भाजपाने हेब्बार यांची ही पोस्ट समोर आल्यानंतर आता काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.