शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवायचा भाजप सरकारचा डाव; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील 40 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. 15 जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये नवव्यांदा बैठक होईल. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनावश्यक चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा उद्देश निरर्थक आहे. देशातील अन्नदाता सरकारचा उद्देश जाणत असून त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे कृषी विरोधी कायदे मागे घ्या” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेते पहिल्या बैठकीपासून त्यांच्या या मुख्य मागणीवर ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम नाही. त्यामुळेच आतापर्यंतच्या बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत सरकार कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. तर कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. सरकारनं केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यामुळे अडत्यांची भूमिका संपेल आणि शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या