खाजगी कंपन्यांच्या हितासाठी भाजप सरकारचे षडयंत्र – जयंत पाटील

नागपूर  – आज राज्य सरकारने निर्यात होणाऱ्या दुधासाठी ५ रूपये अनुदान दिले आहे. महाराष्ट्रातून कोणी दूध निर्यातच करत नाही म्हणजे पुन्हा एकदा दूध टेट्रा पॅकमध्ये घालून निर्यात करणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या हितासाठी हे षडयंत्र भाजप सरकारतर्फे रचले जात असून गुजरातचं अमूल दूध महाराष्ट्रात विकलं जावं आणि महाराष्ट्रातला दूध उत्पादक नष्ट व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला.

दुधाला भुकटी निर्यातीसाठी पाच रूपये प्रति किलो अनुदान सरकारने दिले हा निर्णय उशीरा झाल्याने त्याचा फायदा ज्या खाजगी कंपन्यांनी आधीच दुधाची भुकटी केलेली आहे त्यांना झाला. याचा अर्थ भाजप सरकारचे खाजगी कंपन्यांच्या हितासाठीच हा निर्णय होता आणि हे सरकारचे षढयंत्र होते.

दुधउत्पादक शेतकऱ्याला पाच रुपयाचं अनुदान थेट त्याच्या खात्यात वर्ग करा अशी आमची मागणी आहे परंतु सरकार त्याला तयार नाही. महाराष्ट्रात अतिरिक्त दूध उत्पादन झाले आहे. त्या दुधाची भुकटी करण्यासाठी…भविष्यातील दुधासाठी जर सरकारने काही अनुदान दिले तर त्याचा फायदा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

आज शेतकरी आंदोलन पेट घेत असताना हे सरकार ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी खाजगी कंपन्यांना ३ रूपये दरवाढ करा अशी दमदाटी करत आहे. आमची ५ रूपये थेट अनुदान देण्याची मागणी मान्य न केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकसंघ होवून ताकदीने लढा देण्याची गरज आहे. सरकारला वाकवल्याशिवाय सामान्य शेतकरी आता स्वस्थ बसणार नाही असा इशाराही आमदार जयंत पाटील यांनी दिला.c