fbpx

पुण्यात ‘वारकरी भवन’ उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला : मनसे

पुणे- ज्या संत महात्म्याच्या परंपरेतून हा महाराष्ट्र घडला. ज्या संत महात्म्याच्या आणि विठू माउलींच्या गजरात लाखो वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेने धाव घेतात त्या वारकरी बांधवासाठी पुणे शहरात ‘ वारकरी भवन ‘ उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. २०१५ ला नाना पेठेतील रास्ता पेठ भागात वारकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. वारकरी भवनासाठी आरक्षित केलेल्या जागेचा वापर दुसऱ्या व्यावसायिक कामासाठी करता यावा म्हणून मनपामध्ये सत्ता बदल होताच प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी एक पत्रक काढून केला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रकात ?

माननीय. महोदय,

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षाने हज हाऊस अशा आरोळ्या मारण्यास सुरवात केली आहे. आणि हज हाऊस होणारचं असे आश्वासन देखील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी दिले आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत मी हज हाऊस देणार अशी आरोळी दिली आहे.

ज्या संत महात्म्याच्या परंपरेतून हा महाराष्ट्र घडला. ज्या संत महात्म्याच्या आणि विठू माउलींच्या गजरात लाखो वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेने धाव घेतात त्या वारकरी बांधवासाठी पुणे शहरात ‘ वारकरी भवन ‘ उभारण्याचा मात्र सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे. नुसता विसरच पडत नाही तर वारकरी भवनासाठी आरक्षित केलेल्या जागेचा वापर दुसऱ्या व्यावसायिक कामासाठी करता यावा म्हणून मनपामध्ये सत्ता बदल होताच जल्दी जल्दी प्रयत्न केले जातात. २०१५ ला नाना पेठेतील रास्ता पेठ भागात वारकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. सत्ता बदल होताच भाजपच्या नगरसेवकाने आर्थिक हेतूने प्रेरित होऊन वारकरी भवनाच्या प्रस्तावाला लाथ मारत व्यावसायिक इमारतीचा प्रस्ताव मान्य केला. सदर प्रकरणानंतर हे वारकरी भवन शहरापासून दूर मोहम्मदवाडी मध्ये नेह्ण्यात आला. लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी हे शहराच्या मध्यवस्तीत राहतात. शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मोहम्मदवाडीच्या ठिकाणी वारकरी भवन उभारून वारकऱ्यांना त्याचा कितपत लाभ होईल हा प्रश्नच आहे. नुसतं वारकरी भवनाचं काय पण येऊ घातलेल्या वारीमध्ये दोन दिवस शहरात मुक्काम करणाऱ्या वारकरांच्या डोक्यावर पावसापासून संरक्षण करणारा मंडप देखील पडेल कि नाही यांची शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे.

या शहरालाच नाही तर महाराष्ट्राला पुण्यात वारकरी भवन उभे राहण्याची गरज वाटते. उभा महाराष्ट्र लाखोंच्या संख्येने पुणे शहरात असतो. शहराला लागून देहू आळंदी आहे. सातत्याने या भागात जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. या शहराला मोठा धार्मिक वारसा आहे अशा ठिकाणी वारकरी भवनाची इमारत सर्वात प्रथम उभी राहणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजपा हज हाऊसच्या आरोळ्या जोर जोरात देत आहेत. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र शब्दात निषेध करीत आहे.