निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपाचे नाटक : मायावती

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात “रामजी’ हे त्यांच्या वडिलांचे नाव वापरण्याच्या सरकारच्या निर्णयावरून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. “व्होट बॅंके’साठी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

रामजी हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते. उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनंतर त्यांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.

यापूर्वीही मायावती यांनी भाजपावर टीका केली होती. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपा हे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची काळजी करत. तर भाजपा त्यांच्या नावावर नाटक करत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी बाबासाहेबांच्या नावात बदल केला जात आहे. बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांवर अत्याचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.