किमान चार तास तरी दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची भाजपची मागणी

lockdown

ठाणे  : ठाणे शहरात किराणासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता उर्वरित सर्व दुकाने दररोज किमान चार तास सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी भाजपाने केली आहे. कोरोना आपत्तीत अडचणीत आलेल्या व्यापारी व छोट्या दुकानदारांसह कर्मचाऱ्यांना नव्या संकटात ढकलू नये, अशी विनंती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या `ब्रेक द चेन’ अंतर्गत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यापारी आस्थापना ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचे जाहीर केले आहे. त्याच्या अंमलबजावणीला महापालिका व पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे शहरासह राज्यभरात किराणा सामान, दूध, मेडिकल स्टोअर्ससह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. मात्र, अन्य वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात वर्षभरापासून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ठाण्यातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने कायमची बंद केली. तर बहूसंख्य व्यापाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला. राज्य सरकारने `अनलॉक’ सुरू केल्यानंतर व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सद्यस्थितीत कोविड निर्बंधांचे पालन करीत व्यापारी व्यवसाय करीत आहेत. मात्र, आता पुन्हा दुकाने व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याच्या निर्णयाने व्यापारी संकटात सापडले आहेत.

दुकाने सुरू राहिल्यास, दुकानदार-व्यापाऱ्यांबरोबरच दुकानातील कर्मचारी, मालाची ने-आण करणारे कर्मचारी आदींबरोबरच कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, जवळजवळ महिनाभरासाठी दुकाने बंद ठेवल्यास व्यापारी आणखी संकटात जातील, अशी भीती भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. या शिष्टमंडळात आमदार डावखरे, आमदार केळकर यांच्याबरोबरच भाजपाच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा यांचा समावेश होता.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत खुली राहणार आहेत. त्याच धर्तीवर सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत दुकाने व इतर व्यापारी आस्थापनानांही परवानगी द्यावी. या काळात ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सिंगबरोबरच कोविड निर्बंधांचे पालन करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. तरी सकाळी किमान ४ तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या