सांगली : सांगली मिरज कुपवाड महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी हे विजयी झाली आहे.
महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण, आधीच भाजपचे सात नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकाळी 11 वाजता कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सूकर झाला.
सांगली महापालिकेत भाजपकडे 43 काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी आपल्या होमग्राऊंडमध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला.
महत्वाच्या बातम्या
- आरबीआयकडून हटके अंदाजात बनावट फोन आणि मेसेज संदर्भात अलर्ट जारी
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- इंधन दरवाढी वरून आरबीआय गव्हर्नर यांच सरकारला अप्रत्यक्ष आवाहन
- ‘केलेल्या पापाची कबुली द्यायला पूजा चव्हाणचा हत्यारा संजय राठोडची पोहरादेवीत हजेरी’
- ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय अतिक्रमणमुक्त