‘शिवसेनेला वचन पाळणारा मित्र असे म्हणणे ही शरद पवारांची हतबलता’, भाजपची टीका

मुंबई : भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण यानंतर राजकीय वातावरणात मात्र एकच खळबळ उडाली होती. हे सरकार टिकणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. पण त्यावर काल शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

‘हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही’, असे विधान पवार यांनी केले. दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी टीका केली आहे.

“शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकिय हतबलता आहे. तसेच ही शरद पवारांची राजकीय अडचण आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकले नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे अशी टीका राम कदम यांनी केली.

काय म्हणाले होते पवार?

देशात जनता पक्षाचे सरकार असताना त्यावेळी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सगळीकडे पराभव झाला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. त्या पक्षाने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला हा इतिहास विसरता येणार नाही. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना, असे कौतुकोद्गार पवार यांनी यावेळी काढले.

ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी-नारायण राणे

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो’ असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP