निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसलेत; भाजपची बोचरी टीका

uddhav thakrey

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

मात्र, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर राज्यभरातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यामुळे आता यात बदल केला जावा अशी मागणी भाजपसह मनसेने देखील केली आहे. तर, महिला कल्याण व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील अमरावती मधील कडक निर्बंध शिथिल करा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘विरोधी उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या बाबतीत राज्य सरकार गोंधळून गेलं आहे. रोज नियम बदलले जात आहेत. तर, मंत्री परस्परविरोधी विधानं करत आहेत. हा निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झाली’ असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या