भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनम महाजन

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि खासदार पूनम महाजन यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली असून अनुराग ठाकूर यांच्याकडून त्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारतील.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री पक्षाच्या विविध मोर्चाच्या अध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये पूनम महाजन यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये पक्षांतर्गत बदल केले जातील अशी चर्चा होती. अमित शहा यांनी नवी टीम तयार करायची आहे अशी चर्चादेखील रंगली होती. अखेर अमित शहा यांनी पक्षांतर्गत बदल केले आहेत. अनुराग ठाकूर हे सलग दोन वेळा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी असल्याने त्यांच्या जागी नवीन व्यक्ती येणार हे जवळपास निश्चित होते. अनुराग ठाकूर यांच्यानंतर आता पूनम महाजन यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.  टीम अमित शहामध्ये पूनम महाजन यांची वर्णी लागल्याने महाजन यांचा पक्षातील दबदबा वाढला आहे. पूनम महाजन यांचे पिता स्व. प्रमोद महाजन यांनीदेखील १९८० च्या सुमारास भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. प्रिया दत्त यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचा पूनम महाजन यांनी पराभव केला होता. अमित शहा यांनी भाजपच्या मागासवर्गीय मोर्चा आणि अन्य विभागातील अध्यक्षांचीही नियुक्ती जाहीर केली आहे. खासदार विनोद सोनकर यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी दारासिंह चौहान, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी विरेंद्रसिंह मस्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.