गोपीनाथरावांशिवाय भाजप पूर्ण होऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा :  बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथरावांशिवाय भाजप अपूर्ण असल्याचं विधान केले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, मागील साडेचार वर्षाच्या काळात पंकजाताई आणि प्रितमताईंनी हक्काने हजारो कोटींचा निधी बीड जिल्ह्यात खेचून आणला. त्यातून जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली असून काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आज जर गोपीनाथराव मुंडे असते तर ‘जे काम मी करू शकलो नाही, ते माझ्या लेकीने करून दाखविले’ असे ते नक्कीच म्हणाले असते.

तसेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी प्रयत्नपूर्वक भारतीय जनता पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्याशिवाय भाजप पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचा वारसा खंबीरपणे चालविण्याचे काम पंकजाताई आणिप्रितमताई मुंडे या भगिनी करत आहेत.

गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावण्याचा अधिकारी या भगिनींना तर आहेच, परंतु ज्यांनी त्यांच्यासोबत बेईमानी केली नाही त्या प्रत्येकाला गोपीनाथराव मुंडे यांचे नाव लावण्याचा अधिकार आहे, तसाच मला देखील आहे अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रीतमताई यांनी वडिलांचे नाव लावण्याबाबत आक्षेप घेणारांना फटकारले. प्रितमताईंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, त्यामुळे सशक्त सरकारसाठी प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.