fbpx

प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप , थोड्याच वेळात होणार सुनावणी

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या दबंग खासदार अशी ओळख असणाऱ्या भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास अपटे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर विविध आक्षेप घेतले आहेत.

प्रितम मुंडे याचं ‘प्रितम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रितम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रितम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखप्रत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे.

तर मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती लपवली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी कालिदास यांच्याकडून करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीदेखील प्रीतम यांच्यावर असेच आक्षेप घेतले आहेत. निवडणूक अधिकारी या प्रकरणाची 4 वाजता सुनावणी करणार आहेत.

दरम्यान, प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर केल्याचा आरोप बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास अपटे यांनी केला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करत मतदारांना भावनिक करून राजकीय फायदा करत असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात करण्यात आली आहे.