राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार : फडणवीस

Uddhav-Thackeray-Devendra

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. आज भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा युतीचचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘भाजपच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमच्या यात्रेनंतर अनेक पक्षांना उत्साह आला आहे आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच राज्यातील जनतेला हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनादेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती दिली. तसेच सध्या देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्राचा समावेश असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचाही निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा तर भाजपकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे.