अखेर सत्तेसाठी भाजप व काँग्रेस एकत्र!

मिझोरम: राज्यातीलच नाही तर देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि कॉंग्रेस मिझोरममध्ये एकत्र आले आहेत. सत्तेसाठी राजकीय शत्रू अचानक मित्र झाले. यापूर्वी गोव्यामध्ये भाजपने चाणक्य नीतीचा वापर करून भाजपमध्ये सत्ता स्थापन केली होती.

मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपा व काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. स्वायत्त परिषदेच्या २० जागांपैकी काँग्रेसला सहा तर भाजपला पाच जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने आठ जागा मिळवल्या. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी माहिती दिली आहे.

एकमेकांना विरोध करून मतदारांना नेहमीच बुचकळ्यात टाकणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेसने युती करून स्वार्थीपणा साधल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार आहे. दरम्यान, राज्य भाजपा नेतृत्व मात्र या आघाडीबाबत नाराज असून काँग्रेसबरोबर आघाडी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर भाजपा कारवाई करेल, असे वृत्त आहे.