VIDEO- अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत केला लग्नाचा वाढदिवस

सोलापूर – प्रत्येक जोडप्याला वाटते की, आपल्या लग्नाचा वाढदिवस रम्य, प्रसन्न ठिकाणी कॅण्डल लाइट डिनरसह व्हावा. मात्र सोलापुरातल्या एका जोडप्याने आपल्या लग्नाचा २० वा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. वीस वर्षे संसार केलेल्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट, मित्र – मैत्रीण आणि इतरही मंडळी मोठ्या प्रमाणावर जमली होती.

सोलापुरातील नावाजलेले शिल्पकार नितीन जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव यांनी अंधश्रद्धेचा निषेध करत नवीन विचारांचा पायंडा पाडत हा उपक्रम साजरा केला. आप्तेष्ट मंडळींनी केक, गाजराचा हलवा, भेटवस्तू, गुलाबाच्या पाकळ्या आणल्या होत्या तर कुणी चहाची व्यवस्था केली होती. थंडी पडलेली, शांतता अशा स्मशानभूमीत सगळ्यांनी चॉकलेट केक खाऊन गरमागरम चहाचे फुरके घेतले.

वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा अक्षता टाकून नितीन – अभिंजली यांचा आनंदी वातावरणात छोटेखानी लग्न सोहळाच झाला. नितीन जाधव हे अभिनय क्षेत्रात कार्यकर्ता, शिल्पकलेचे काम करतात. पत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमाने विविध सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. झगमगाटात सारे जण वाढदिवस साजरे करतात. पण अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा ही संकल्पना त्यांना सुचली. यातून संदेश द्यावा असे वाटले.

लग्नाचा वेगळ्यापद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या आईबाबांचा अभिमान वाटतो. आमचे आई – बाबा नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. एखादी समस्या मोठी असेल तर त्यावर कसा तोडगा काढावा या करिता ते नेहमीच वेगळा विचार करत असतात. त्यातूनच त्यांनी ही संकल्पना पूर्णत्वास आणली आहे. त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, नितीन अभिंजली यांच्या कन्या मनाली अनिशा यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...