‘बर्ड फ्लू’चा धसका, महाराष्ट्रातील ‘या’ गावात पक्ष्यांच्या विक्रीवर बंदी

bird flu

बीड – पाटोदा तालुक्यातील मुगगावात ‘बर्ड फ्लू’मुळे अकरा कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने मुगगाव परिसरातील १०० कोंबड्यांचे स्वॅब घेतले असून ते पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाला पाठवले आहेत. मुगगावला संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाटोदा-आष्टी तालुक्यातील अकरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झालीत. या गावात आता पक्ष्यांच्या विक्रीवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूबद्दल कोणीही अफवा पसरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
बर्ड फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दहा किलोमीटरच्या अंतरातील पाटोदा तालुक्यातील भुरेवाडी, जोगदंड, वसंतवाडी, अंतापूर, वाहली, चिखली, निवडुंगा, सुपा सावरगाव, तर आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव व पांगुळगव्हाण अशा एकूण ११ गावांत पक्ष्यांच्या विक्रीवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या नाकातील द्रव व विष्ठेचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.

कोणीही अफवा पसरू नका
बर्ड फ्लूबद्दल शास्त्रीय माहिती नसलेले गैरसमज व अफवा कोणीही पसरवू नये. जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक व नागरिकांनी आपल्या गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी. मृत पक्ष्यास हात लावू नये, शवविच्छेदन करू नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेल्सियस तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित असल्याचे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या