येत्या जून महिन्यापासून महाविद्यालयांमध्ये बायोमॅट्रिक्स हजेरी?

पुणे: महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन क्लासेसमध्ये बसणारे विद्यार्थ्यांना आता शिक्षण विभागाकडूनच आळा घालण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यापासून महाविद्यालयांमध्ये बायोमॅट्रिक्स हजेरी अनिवार्य करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी क्लासचालकांना दिली असल्याचे क्लासचालकांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे आता क्लासेसशी होणारे टायअप आपोआपच बंद होणार असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी कोचिंग क्लास संदर्भात सध्या कायदा करण्याचे काम सुरु असून त्याबाबत खासगी क्लासचालकांच्या प्रतिनिधींसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठित केली केली आहे. या समितीच्या चार बैठका झाल्या असून मंगळवारी पाचवी बैठक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबरच चार शिक्षण आमदारांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला आमदार ना.गो.गाणार, सुहास पाटील, सुरेश खाडे व अमर पंडित तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे संचाकल गंगाधर म्हमाणेही उपस्थित असल्याची माहिती समितीतील सदस्य व प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा.बंडोपंत भुयार यांनी दिली.

भुयार म्हणाले, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार क्लासचालकांनी आमचे शुल्क शिक्षण विभागाने ठरवू नये असे सांगितले. त्याबाबत शिक्षणमंत्री सकारात्मक असल्याचेही भुयार यांनी सांगितले. दरम्यान कायद्याचा मसुदा अद्याप तयार झाला नसून आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. तसेच विद्यार्थीसंख्या किती असावी याबाबतही सकारात्मक चर्चा झाली असल्याचे भुयार यांनी सांगितले.