मनपा आरोग्य विभागात कोट्यवधींची बिले थकीत, डॉ. मंडलेचांनी मागवला खर्चाचा हिशोब

mandlecha

औरंगाबाद : बीड येथून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी देणे अपेक्षित असतांना मनपा आयुक्तांनी या पदाची विभागणी केली. मात्र आता आयुक्तांनी संपूर्ण पदभार मंडलेचा यांच्याकडे दिल्यानंतर आपल्या पद्धतीने त्यांनी कामास सुरुवात केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात कोट्यवधींची बिल थकीत आहेत. त्यामुळे डॉ. मंडलेचा यांनी कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब मागून खऱ्या अर्थाने संपूर्ण कामकाज हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाने डॉ. पारस मंडलेचा यांची बीड येथून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन महिन्यांपूर्वी बदली केली आहे. त्यानुसार महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देणे अपेक्षित होते. पण महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर व डॉ. मंडलेचा यांच्यात कामाची विभागणी करून दोघांची एकाच पदावर नियुक्ती केली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य विभागात दोघांत शितयुद्ध सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा पूर्ण कार्यभार सोपवला आहे. दरम्यान कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले गेल्या सात-आठ महिन्यांपासून थकीत आहेत. हे कंत्राटदार महापालिकेत खेट्या मारत आहेत.

डॉ. मंडलेच्या यांच्याकडे संपूर्ण पदभार येताच कंत्राटदार त्यांच्याकडे थकीत बिलाची मागणी करत आहेत. कोणत्या कामावर किती खर्च झाला आहे, याची अद्याप मला माहिती नाही, अशी भूमिका मंडलेचा यांनी घेतली आहे. तसेच आतापर्यंत संबंधितांकडून त्यांना याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर डॉ. मंडलेचा यांनी डॉ. निता पाडळकर यांच्याकडून माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या