व्यवसायात गुंतवणूकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, दोन वर्षानंतर आवळल्या सूत्रधाराच्या मुसक्या

औरंगाबाद : कमोडीटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून मुख्य संचालक प्रशांत रमेश धुमाळ (रा. जाधववाडी) याच्यासह धुमाळ कुटुंब, दलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को. आॅप. सोसायटीच्या व्यवस्थापकाला सात लाखांना गंडविल्याचा प्रकार २०१९ मध्ये समोर आला होता. यापुर्वी देखील धुमाळविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तब्बल दोन वर्षानंतर मुख्य सूत्रधार प्रशांत धुमाळ याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे धुमाळ याने आणखी २० ते २२ गुंतवणूकदारांकडून अशाच प्रकारे अमिष दाखवून त्यांचे १ कोटी ८२ लाख रुपये लाटल्याचे उघडकीस आले आहे.

सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को. आॅप. सोसायटीमध्ये अनिलकुमार सुनील जैस्वाल (३0, रा. जाधववाडी) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रशांत धुमाळशी ओळख झाली होती. त्याने जानेवारी २०१४ मध्ये सीटीए (कमोडीटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो पटवून दिले. तसेच गुंतवणुकीवर जैस्वाल यांना दहा टक्के व्याज देणार असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन १ मार्च २०१४ रोजी जैस्वाल यांनी धुमाळच्या सीटीए या व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणूकीवर ठरल्याप्रमाणे जैस्वाल यांना ३५ हजार रुपयांचा हप्ता काही महिने व्याजाच्या स्वरुपात देण्यात आला. त्यानंतर जैस्वाल यांनी मिळालेले व्याज व रोख अशी सात लाखांची पुन्हा गुंतवणूक केली.

ही गुंतवणूक केल्यावर मात्र, धुमाळ व दलालांनी आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे बँकेच्या खात्यात पैसे नाही. खात्याचे व्यवहार बंद करण्यात आले आहे. अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन पैसे देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे धुमाळने अशाच प्रकारे त्याने शहरातील २० ते २२ गुंतवणूकदारांना गंडविल्याचे समोर आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली. त्यावरुन धुमाळसह पत्नी भावना, सख्खा भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अविनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पुर्णपात्रे यांच्याविरुध्द फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार दुसऱ्यांदा एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई सपोनि अमोल सातोदकर, पोलीस अंमलदार नितीश घोडके, संदीप जाधव, महेश उगले, बाबासाहेब भानुसे व नितीन देशमुख यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP