मुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक बांधा- नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा –दोन दिवसापूर्वीच अरबी समुद्रात शिवस्मारकाची पायाभरणी करण्यासाठी समुद्रात जात असताना एका बोटीला अपघात झाला होता. यात सिद्धेश पवार या शिवप्रेमी तरूणाचा मृत्यू झाला होता तर २३ जण थोडक्यात बचावले होते. यानंतर शिवस्मारक अन्य ठिकाणी व्हावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

अरबी समुद्रात होणारे शिवस्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये व्हावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी टि्वटच्या माध्यमातून केली आहे. तसेच शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर होण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार अहोत, असेही टि्वट त्यांनी केले.

विशेष म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांची देखील बऱ्याच दिवसांपासून अशीच मागणी आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला सीमा नव्हत्या. छत्रपतींनी राज्यातील अनेक गड कोटांवर पराक्रम गाजविला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात त्यांचा पुतळा न उभारता गड-किल्ल्यांवर स्मारक उभे केले पाहिजे अशी मागणी संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी गारगोटी येथे केली होती.

दरम्यान,मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक उभारण्याचा अट्टाहास सोडून सरकारने मलबार हिल येथील राजभवनाच्या जागेवर स्मारक उभारावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. याचा संदर्भ घेत नितेश राणे यांनी राजभवन ऐवजी हे शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधण्यात यावे अशी मागणी केली आहे.