fbpx

भीमसैनिकाचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन, ‘ही दौलत भीमरायाची’ होतीये प्रचंड लोकप्रिय !

पियुषा अवचर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  १२८ वी जयंती काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, विविध कार्यक्रम आयोजित करून, महामानवाला अभिवादन करण्यात आले. या जयंतीदरम्यान सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे एका भीमसैनिकाने तयार केलेली ‘ही दौलत भीमरायाची’ नावाची आकर्षक दुचाकी. या दुचाकीवर नजर जाताच जो आनंद नागरिकांना होत होता तो शब्दांमध्ये मांडणे अशक्यचं.

ही दुचाकी बारामती जिल्ह्यातील जळोची येथे राहणाऱ्या मोहन प्रल्हाद कांबळे यांनी तयार केली आहे. गेल्या चार वर्षांपासून ते त्यांच्या दुचाकीला वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून सजवत आहेत. गाडीच्या चारही बाजूने लावलेल्या लाईट्समुळे तीच्या सौंदर्यात अधिकचं भर पडली आहे. यावर्षी मोहन कांबळे यांनी दीक्षाभूमीची प्रतिकृती तयार करून ती त्यांच्या गाडीला अत्यंत कौशल्याने लावली होती. गाडी पाहून नागरिकांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. दरवर्षी अशा नवनवीन प्रतिकृती बनवून ते गावोगावी फिरत असतात. जयंतीदरम्यान ही आकर्षक दुचाकी सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली.

कशी सुचली कल्पना ?

मोहन कांबळे यांना ही कल्पना कशी सुचली याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘मी पहिल्यापासूनच बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारा व्यक्ती आहे. लोकांपर्यंत बाबासाहेबांबद्दल माहिती पोहचावी, त्यांचे कार्य, कशाप्रकारे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जीवाचे रान करून आपल्याला न्याय मिळवून दिला यासाठी मी गेल्या चार वर्षांपासून १ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत गावोगावी या तयार केलेल्या दुचाकीवर फिरत असतो. या कार्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे आणि मित्रांचे मोलाचे योगदान आहे असेही ते म्हणाले. आज आपण जे काही आहोत ते केवळ बाबासाहेबांमुळेच आहोत याची प्रत्येकाला जाणीव असायला हवी. आणि समाजाला हा संदेश पोहचवण्यासाठीचं मी हा छोटासा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या कल्पनेचे सर्वांकडून भरभरून कौतुक होत आहे. पुढील वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीला कोणत्या प्रतिकृतीसह ते पुन्हा सर्वांच्या भेटीला येतील यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. शिवाय त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी देखील केली होती. त्यामुळे त्यांना सध्या एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे महत्व मिळत आहे.