मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे मुंबई पोलिसात

मुंबई – बिहारचा सिंघम अशी ओळख असलेल्या मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची अखेर मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकामध्ये पोलीस उपायुक्तपदी शिवदीप लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांची ही मागणी मान्य करत सरकारने पुढील तीन वर्षासाठी महाराष्ट्रात पाठवले आहे. शिवदीप लांडे हे यापूर्वी बिहारमध्ये स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

विजय शिवतारेंचे जावई

“शिवदीप लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्वात दहशत बसवली आहे. अशा अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे. शिवदीपने महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावं अशी आमची इच्छा आहे” असं शिवदीप लांडे यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले होते. शिवतारे हे शिवसेना नेते आहेत. त्यांना आपल्या जावयाचा अभिमान आहे. लांडेंने केलेल्या कारवाईंचे ते अनेकवेळा दाखले देत असतात.

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी येथे झाला. शिवदीप हे एका शेतकरी कुटूंबातील असुन त्यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांनी शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी मिळविली आहे.

यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली.

यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.