नागपुरात कोरोनाने थैमान घातले असताना राजकीय श्रेयवादासाठी नेत्यांची धडपड सुरूच

nagpur politics

नागपूर : शहरातील कोरोनाचे थैमान वाढले आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या तिनशेच्या पुढे पोहचली असून, याचाच आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी महापालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र एकाचवेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक बोलावली असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

निव्वळ राजकीय श्रेयसाठी सुरू असलेला हा खटाटोप नागपुरकांच्या जीवाशी येण्याची आता शक्यता आहे. उपराजधानी नागपुरातील स्थिती झपाट्याने नियंत्रणाबाहेर जात असताना स्थानिक नेते अजूनही राजकीय डावपेच खेळण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे. दर दिवसाला कोरोनाग्रस्तांचा नवीन उच्चांक शहरात नोदविला जात असून, गेल्या चार दिवसांपासून सत्ताधाऱ्यांच्या, पालकमंत्र्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनात कमालीचे अंतर दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर शहरात खरेच लॉकडाऊन लागणार का ? आणि लागले तर ते किती दिवसांचे राहणार या बाबत विविध अफवांना उत आला आहे.

अशात पूर्वनियोजित महापौरांच्या बैठकीच्यावेळी पालकमंत्र्यांनी वेगळी चुल मांडणे कितपत योग्य आहे हे कळायला मार्ग नाही. दुपारी १२ वाजता प्रारंभ झालेल्या महापालिकेतील बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र त्यानंतर सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पालक मंत्र्यांचे निमंत्रण आले अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तालयाच्या दिशेने प्रयाण केले.

महत्वाचे म्हणजे दोन्ही बैठकीची उद्देश एकच आहे. चर्चाही एकाच विषयावर होणार आहे. नागपूरकर गेल्या काही दिवसांपासून महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष अनुभवत आहेत. त्यात आता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्वत:ची वेगळी बैठक बोलावली असल्याने राजकीय श्रेयवादात नागपूरकरांचा जीव टांगणीलाच अडकणार यात वाद नाही.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ…

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

शिवसेनेचा ‘हा’ धडाकेबाज आमदार अडकला कोरोनाच्या विळख्यात,मंत्र्यांसह कार्यकर्त्यांची चिंता वाढली