मोठी बातमी : संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार यांची नाराजी

sanjay rathod

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्या प्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. सामान्यांसाठी वेगळे व मंत्र्यांसाठी वेगळे नियम आहेत का ? असा सवाल करण्यात येत होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते.

कोरोना संदर्भातली बैठक सुरू असताना शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले असतानाच चर्चांना उधान आले होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या पोहरादेवी मधील शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. कोरोनाबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचं दिसत असतानाच सत्तेतील पक्षाच्या नेत्याच्या उपस्थितीत हजारोंचा जनसमुदाय जमा होणे हे महाविकास आघाडी सरकार विरोधात विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिल्याप्रमाणे आहे. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उगारला कारवाईचा बडगा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या