मोठी बातमी : नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य!

CM Maharashtra

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल, रस्ते, धरणं, पुल अशा सर्वच ठिकाणी फटका बसला आहे. आधी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे हातचे पिक गेले आहे. या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींच्या अर्थसहाय्याची घोषणा केली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होतीच. त्यानुसार मंत्रिमंडळाने १० हजार कोटींच्या अर्थसहाय्यास मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

या संदर्भात निश्चित रुपरेषा अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी, यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच पंचनामे न करता सरसकट मदत करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. त्यानुसार या पॅकेजचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या