मोठी बातमी! माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे याच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर राज्याचं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तसंच अनिल देशमुख यांनाही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात आणखीन एका मोठ्या प्रकरणाची भर पडली आहे.

परमबीर यांच्या विरोधात मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे.

श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आठ जणांपैकी ६ जण पोलीस आहेत. त्यांच्यावर कलम 387, 388, 389 ,403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 b), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले आहे.

राज्य सरकारचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आदेश
गेल्या आठवड्यात ठाकरे सरकारने परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला होता. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

ईडीच्या रडारवरही परमबीर
परबीर सिंह सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यी लवकरच त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईडी परमबीर सिंह यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP