मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

police

गडचिरोली : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. सण-उत्सव अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच राज्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात देखील वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू सोबत नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडण्याची किंवा फेकण्याची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे आदी गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

यासोबतच, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या