मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यासाठी बोर्ड अनुकूल !

exam

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. तर, कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे.

नुकत्याच राज्यभरात शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्यात येत आहेत. तर, बोर्डाच्या परीक्षा असल्याने दहावी-बारावीचे वर्ग प्रथम सुरु करण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे सक्तीचे नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडं, शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडल्याने नेहमी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा मार्च-एप्रिल महिन्यात होणार असल्याचे वझीर करण्यात आले होते. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक देखील बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत बोर्डाकडून काहीसे संकेत देण्यात आले आहेत. दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, ऑनलाईन परीक्षा घेेण्यास बोर्ड अनुकूल नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा आज घेतला आहे. दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. दरम्यान, राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहेत.

परीक्षा कधी ?

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) १२ वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) १० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये अनुक्रमे २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ आणि २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या