मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव

bawankule

रांची : राज्य आणि देशाच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. याकरिता आघाडीच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खरेदीसाठी विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आरोपीने घेतल्याने खळबळ उडाली आहे. बावनकुळे यांच्यासमवेत काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखेडे या भाजप नेत्यांची नावेही आहेत.

आमदार खरेदी प्रकरणातील आरोपी अभिषेक दुबे याने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने ही नावे सांगितली आहेत. दुबे याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. दुबेच्या म्हणण्यानूसार, काँग्रेसचे दोन आमदार उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि अपक्ष आमदार अमितकुमार यादव यांच्यासह १५ जुलै रोजी दिल्लीला गेलो होतो. तेथे महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांशी आमदारांचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर दिल्लीत व्दारका येथील विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतर बावनकुळे, चरणसिंग यांच्यासह काही नेत्यांच्या घरी गेलो, असा दावा अभिषेक दुबे याने केला आहे.

१६ जुलैला सकाळी १० वाजता तिन्ही आमदारांना घेऊन बेलखेडे, बावनकुळे आणि चरणसिंह यांनी अनेक नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. तेथे आमदारांना एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याबाबत चर्चा झाली. पण आमदारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ते सर्वजण नाराज होऊन रांचीला परतले. रांचीला आल्यानंतर सर्वजण आपापल्या मतदारसंघांत निघून गेले.

दरम्यान, अभिषेक दुबे याने त्याच्या काही साथिदारांसह हॉटेल ली लॅकमध्ये मुक्काम ठोकला होता. त्यावेळी जयकुमार बेलखेडे हे बोकारो येथील अमितकुमार व संतोषकुमार दोन आमदारांशी व्यवहार ठरवत होते. पण तेथे पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वीच ते निघुन गेले होते. त्यामुळे पोलिसांच्या धाडीत दुबे पकडला गेला. यानंतर दुबेने सर्व कहाणी पोलिसांसमोर कथन केली. त्यात बावनकुळे यांचेही नाव त्याने घेतले.

महत्त्वाच्या बातम्या