गारगुंडीच्या आगीत शेकडो वन्य प्राणी व पक्षी भक्ष्यस्थानी

पारनेर/प्रशांत झावरे  : तालुक्यातील गारगुंडी येथे काल दि. २३ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास लागलेल्या आगीत शेकडो वन्य प्राणी व पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे १२ तास भडकलेली आग पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पत्रकार प्रशांत झावरे व माजी सरपंच बाळकृष्ण झावरे यांच्या प्रसंगावधानाने आटोक्यात आली, त्यांच्याबरोबर गावातील पोस्टमन संतोष झावरे, पोपट गिरी, विनायक ठुबे, कुंडलिक ठुबे, बाळासाहेब फापाळे, गंगाधर फापाळे यांनीही आगीला नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केले.

Loading...

गावातील शेकडो लहान मोठी जनावरे उन्हाळ्यात या सार्वजनिक ठिकाणी चरण्यासाठी जातात, जवळच पाणवठा असल्याने भर उन्हाळ्यातही येथे जनावरांची उत्तम सोय होते याचबरोबर शेकडो वन्य प्राणी, पक्षी येथे वर्षभर आश्रयास असतात. सुमारे २५ एकरच्या आसपास असलेले हे ठिकाण दुष्काळी परिस्थितीत पण गारगुंडी गावातील गुराख्याना दिलासा देणारे आहे. तसेच वन्य प्राणी व पक्षी येथे आश्रयास असतात व ऐन उन्हाळ्यातही स्वच्छंदी बागडत असतात, पठार भागावर याच ठिकाणी जवळपास पाण्याचीही सोय असल्याने आसपास ठिकाणचे प्राणी व पक्षी येथे आश्रयास येतात, परंतु याच ठिकाणी लागलेल्या आगीने वन्य प्राणी आणि पक्षी व त्यांची लहान लहान पिल्ले तरफडून जीव सोडत होती, रात्रीच्या वेळी पक्ष्यांच्या पिल्लांना काहीही दिसत नसल्याने वाट मिळेल तिकडे ती अंधारात उड्या मारत होती काही तर आगीतच पडत होती आणि जीव सोडत होती, मदत करणाऱ्यांचा नाईलाज असूनही त्यांनी प्रयत्न करून काही पक्षी व प्राणी व त्यांची पिल्ले वाचवली.

रात्रीच्या वेळेस आग जास्तच भडकल्याचे लक्षात आल्यावर पत्रकार प्रशांत झावरे व माजी सरपंच बाळकृष्ण झावरे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गावातील काही ग्रामस्थांना मदतीस घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुमारे ९ तास प्रयत्न केले. त्यामुळे काही वन्य प्राणी, पक्षी व त्यांची लहान लहान पिल्ले आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचली. परंतु वाढलेले गवत आणि झाडे झुडपे यामुळे आगीच्या ज्वाळा जास्तच भडकत होत्या आणि आग नियंत्रण करण्यास अडचण येत होती. वन अधिकारी, प्रशासन, पोलीस यंत्रणेला पत्रकार प्रशांत झावरे यांनी वारंवार कळवून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्रामस्थ नाराज झाले. परंतु गावाने मोठ्या कष्टाने वाढवलेली वृक्ष संपदा वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी निकराचे प्रयत्न केले. तरीही बरीच झाडे आगीत जळून खाक झाली असून अनेक वन्य प्राणी, पक्षी त्यांची पिल्ले जीवाला मुकली, एवढे होऊनही व वारंवार सूचना देऊन व कळवूनही दुपारपर्यंत कोणीही सरकारी अधिकारी गारगुंडीकडे न फिरकल्याने ग्रामस्थांनी निषेध करून संताप व्यक्त केला.

सुमारे ३३ वर्षांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी रोजगार उपलब्ध करून सुमारे २५ एकरावर झाडांची लागवड केली होती. भर उन्हाळ्यात डोक्यावर पाणी घालवून या झाडांना जागविले. सुबाभळ, बाभळ, लिंब, शिसम, निलगिरी यांसह अनेक प्रकारच्या झाडांची लागवड येथे केली गेली होती, या ठिकाणी झाडांची एकदम थाप असल्याने या जागेला कालांतराने थापा हे नाव पडले. या जागेवर दाट गवत वाढत असते, गावकरी ग्रामपंचायत मार्फत याचा दरवर्षी निलाव करतात, यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न पण मिळते, त्यावर मग जनावरे असणारे व निलाव घेणारे ग्रामस्थ चारा आपापल्या गुरांना कापून नेतात पण तरीही चारा शिल्लक राहत असल्याने उन्हाळ्यात संपूर्ण गावाची जनावरे एकत्रच येथे गुरांना चरावयास येतात, जवळच पाणवठा असल्याने वर्षानुवर्षे गावातील जनावरांच्या चाऱ्याचा ऐन दुष्काळात प्रश्न निकाली निघत असतो.

सरकारी क्षेत्राबरोबर खाजगी मालकीचे जवळपास ४० एकर क्षेत्रावर या आगीने थैमान घातले होते, तसेच याअगोदर २ आठवड्यापूर्वी सरकारी क्षेत्र असलेल्या गायरान या ठिकानी सुद्धा जवळपास १५ एकर क्षेत्राला आग लागून मागील वर्षी लावलेली सुमारे ५ हजारावर नवीन लागवड केलेली झाडे जाळून बेचिराख झाली आहेत. त्यावर सुद्धा काहीही उत्तर प्रशासनाने दिले नाही, सरकार दरवर्षी सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून वृक्ष लागवड करत असते, पण वृक्ष संवर्धनास जर उपाययोजना नसतील तर हा सरकारी पैशांचा अपव्यय असल्याची तिखट प्रतिक्रिया माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे, बबन झावरे, झुंबरबाई ठुबे यांनी व्यक्त केली. यापुढे आम्ही अशा वृक्षारोपण कार्यक्रमास विरोध करू असेही सांगितले कारण वृक्ष संवर्धन न केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नसून सर्वसामान्य माणसांच्याच पैशांचा यामुळे अपव्यय होत असल्याचे मत सरपंच हिराबाई झावरे यांनी व्यक्त केले.

वारंवार कळवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पत्रव्यवहार का करू नये असे प्रश्न गावातील तरुणांनी उपस्थित केले आहेत. यावर आता प्रशासन काय पाऊले उचलणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण तालुक्यात अशा प्रकारच्या बऱ्याच आगी लागून सरकारी जमिनींवरील नवीन व जुन्या वृक्षारोपण केलेल्या झाडांबरोबर जुन्या झाडांचे व वन संपत्तीचे तसेच खाजगी संपत्तीचे पण यामुळे खूप नुकसान झाले आहे. सरकारी वृक्षारोपणाचा यामुळे कोणताही उपयोग होत नसल्याचे यावरून दिसून येत असून प्रशासन यावर निद्रिस्त असल्याचे दिसत आहे.

 Loading…


Loading…

Loading...