समीर वानखेडेंच्या ‘त्या’ आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

sameer wankhede

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. दरम्यान, वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली.

वानखेडे यांनी तक्रार दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वानखेडे यांनी हेमंत नागराळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त याप्रकरणी चौकशी करत असून त्यांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, तक्रार दिली तेव्हा वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील उपस्थित होते. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असे वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितले आहे. दोन जून वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असे सांगत वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या