संभाजी ब्रिगेडमध्ये उभी फूट; गायकवाड-आखरे गटात रंगला कलगीतुरा

sambhaji brigade1

पुणे : विविध सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करू असा थेट इशारा आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

मराठा सेवा संघाची स्थापना १ सप्टेंबर १९९० ला झाली. मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणे हे ध्येय-धोरण घेऊन निघालेल्या या चळवळीने विविधांगी रूपाने फुलण्यासाठी व फुलवण्यासाठी वेगवेगळ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून जाळे विणले. या ३२ कक्षांपैकी १ म्हणजे संभाजी ब्रिगेड.

अत्यंत आक्रमक आणि तेवढीच वैचारीक संघटना म्हणून या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांना जबरदस्त आकर्षण आहे. संभाजी ब्रिगेडचे पहिले अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. धर्मादाय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला.

एका बाजूला धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या नोंदणीत अध्यक्ष म्हणून अजून माझेच नाव असल्याचा दावा गायकवाड यांनी केला असून संघटनेचे नाव वापरण्याचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करू असा थेट इशारा आखरे यांनी दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या नावाचा वापर केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई तर करूच मात्र आम्ही ती जिंकू देखील याचा आम्हाला विश्वास आहे.गायकवाड यांचा आमच्या संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. किमत मिळत नाही हे लक्षात आले तेव्हा गायकवाड संभाजी ब्रिगेडमधे पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करत आहे.कारण दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांची प्रसिध्दी बंद झाली.त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.प्रवीण गायकवाड यांच्या गटाने वेगळी संघटना स्थापन करून सामाजिक कार्य सुरु ठेवावे त्या साठी आमच्या शुभेच्छा आहेत.- संतोष शिंदे पुणे,जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड

आजच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • शेकापमध्ये काही चालेनासे झाल्याने गायकवाड यांनी रडीचा डाव खेळला आहे. त्यांना संभाजी ब्रिगेड हे नाव वापरण्याचा हक्क नाही.
  • पुरुषोत्तम खेडेकर आणि ब्रिगेडमधील कार्यकर्त्यांचा प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर विश्वासघात केला आहे.
  • राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडची आगेकूच अशीच सुरु राहिलं
  • प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा आखरे गटाचा इशारा
  • दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांची प्रसिध्दी बंद झाली.त्यामुळे ते अस्वस्थ झाले असल्याचा जिल्ह्याध्यक्ष संतोष शिंदे यांचा आरोप