उरलेलं ‘गोकुळ’ ही महाडिकांनी गमावलं; पाटील-मुश्रीफांची राजकीय खेळी ‘सक्सेसफुल’

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केला. न्यायालयाने सत्ताधारी गटाची याचिका फेटाळून लावली आणि अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली आहे. जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील यांच्या गटाविरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील महाडिक अशा दिग्गज नेत्यांनी मोट बांधली होती. यामुळे, महाडिक कुटुंबियांना आमदारकी, खासदारकी गमावल्यानंतर आता उरलेल्या गोकुळमध्ये देखील पराभव स्वीकारावा लागला आहे.

२१ पैकी तब्बल १७ जागांवर सतेज पाटलांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ३० वर्षानंतर गोकुळ दूधसंघात सत्तापरिवर्तन झालं असून महाडिक गटाला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला आहे. यामुळे आता जिल्ह्यात सतेज पाटील यांच्यासह हसन मुश्रीफ यांना वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या