fbpx

भुजबळांनी केली मोदींची नथुराम गोडसे सोबत तुलना

टीम महाराष्ट्र देशा- नथुराम गोडसे याने आधी महात्मा गांधी यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक महात्मा त्याने संपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच केलं. मोदी निवडून आले आणि संसदेची पायरी चढताना त्यांनी संसदेचे दर्शन घेतले आणि लोकशाहीला छिन्नविछिन्न केले असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नथुराम गोडसे सोबत तुलना केली आहे.

काल अकलूजमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनयात्रेत बोलताना भुजबळ यांनी भाजप आणि मोदी सरकारवर चांगलीच आगपाखड केली. मोदींनी दडपशाही आणून ठेवली आहे. कोणी काय खायचे, काय बोलायचे, हे ठरवले जात आहे. आता निवडणूक येणार म्हणून काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जात आहे. सरकार पैसे देईलही, पण आज दहा हजार देतील आणि सत्तेत आले की डबल पैसे काढून घेतील.ही मन की बात झुठी बात आहे… यात गोष्टी रंगवल्या जात आहे. सर्व चांगलं सुरू आहे असं लोकांच्या मनावर बिंबवलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरकारवर टीका केली.काही जातीयवादी लोक महात्मा गांधींचा फोटो समोर ठेवून त्याला गोळ्या घालत आहेत आणि तो व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. या भाजपा सरकारच्या काळात महात्मा गांधींचा अपमान केला जातोय आणि हे सरकार गप्प बसतंय. ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये.