कडेगावात भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना अटक

crime-1

टीम महाराष्ट्र देशा – देवी शक्ती असल्याचा दावा करून थेट देवाशीच संवाद साधून देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांची फसवणूक करणा-या एका भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना कडेगाव पोलिसांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सहका-याने अटक केली आहे. या तिघांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यातर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्यात तानाजी महादेव कुंभार उर्फ कुंभार महाराज (वय ६०, रा. तोडोली, ता. कडेगाव), सोपान निवृत्ती महाडिक (वय ५५) व नवनाथ जालिंदर यमगर (वय २२, दोघेही रा. नेवरी, ता. कडेगाव) या तिघांचा समावेश आहे. कुंभार महाराज हा आपल्याकडे देवी शक्ती असल्याचा दावा करून दर गुरूवारी व पौर्णिमेला दरबार भरवित होता. त्याच्याविरोधात अंनिस व कडेगाव पोलीस यांच्याकडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आल्या होत्या.

पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात पूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कुंभार महाराज याने आपल्या दरबारास सुरूवात केली. आपल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आलेल्या प्रत्येकाकडून १०० रूपये नोंदणी शुल्क घेतले जात होते. त्यानुसार भगवान रणदिवे व प्रशांत पोतदार हे दोघेही समस्या सोडविण्यासाठी आले होते. त्यांनी घरात शांतता नाही, सतत भांडणे व वादावादी होतात, अशी तक्रार केली. त्यावर कुंभार महाराज याने आपण देवी शक्तीद्वारे थेट परमेश्‍वराशी संवाद साधल्याचे नाटक केले.

शेजारील वहीत विचित्र पध्दतीने लिखाण करून आपले देवाशी बोलणे झाले आहे, आता तुझी समस्या लवकरच सुटेल, आपल्या देवी सामर्थ्याने तुझ्या सर्व समस्या सुटतील, असे सांगत नारळ व सुपारी घेऊन ते पांढ-या कपड्यात बांधून जोतिबा मंदिरात जाऊन त्यावर गुलाल टाक व ते घराच्या आड्याला बांध, असा सल्ला दिला व मंतरलेला अंगारा देऊ केला. हा संपूर्ण प्रकार कडेगाव पोलिसांनी कॅमे-यात चित्रीत केला.

त्याचवेळी कडेगाव पोलिस व अंनिस पदाधिकारी यांनी छापा टाकून कुंभार महाराज याच्याकडील बुवाबाजीचे साहित्य, मंतरलेल्या पुड्या, रोख रक्कम, नोंद वही व त्यांचे लिखाण ताब्यात घेतले. कुंभार महाराज याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांना अटक केली असून त्यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश शिरतोडे, हवालदार एस. पी. बांगर, एम. डी. जाधव, ए. एल. आंबेकर, एम. एस. महाडिक व व्ही. डी. बुंडे यांनी भाग घेतला.